नागपूर शिक्षण मंडळ द्वारा संचालित श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय महाल, नागपूर आणि विद्या भारती अखिल भारतीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नाने सप्तशक्ति संगम आणि मातृशक्तीसाठी एक दिवसीय शाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या श्रीमती रेणुका खळतकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सरस्वती वंदनेने झाले झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हायस्कूल प्रभारी श्रीमती कीर्ती बल्की यांनी करत मातृशक्तीचे सामर्थ्य प्रभावीपणे रेखाटले. मातृशक्तीशी हितगुज साधताना सन्माननीय सौ. रेणुका खळतकर यांनी कीर्ती, वाणी, स्मृती, बुद्धिमत्ता, संयम व क्षमा हे स्त्रीचे गुण आहेत. समृद्ध भारतासाठी या शक्तींना जागृत करूया व समाज परिवर्तनाचा संकल्प करूया असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी यावलकर यांनी मातृशक्तीला एक समाज हिताचे शस्त्र मानून राष्ट्रनिर्माणासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. प्रसंगी शाळेतील माजी विद्यार्थिनी सौ. प्रीती तायडे आणि डिनल फोफाटे यांचा सत्कारही शाळेद्वारे करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे माता पालकांसाठी एक दिवशीय शाळेचे केलेले आयोजन. याप्रसंगी माता पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी, विविध क्रीडा स्पर्धा मध्ये सर्व माता पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवून विजेतेपद सुद्धा पटकावले. विद्या भारती विदर्भ संस्थेच्या प्रांत संयोजिका व शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सन्माननीय श्रीमती अर्चना जैनाबादकर यांच्या अथक परिश्रमाने व मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे सफल आयोजन शक्य झाले. प्रसंगी सहसंयोजिका स्वाती भोळे, श्रीमती पोहरे, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष श्रीमती सुचिता अग्रवाल, सचिव श्रीमती शीतल तेलंग तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती सुषमा पंचभाई, हायस्कूल प्रभारी श्रीमती कीर्ती बल्की व कनिष्ठ महाविद्यालय प्रभारी कांचन चौधरी प्रामुख्याने उपस्थित होत्या. माता पालकांनी देखील या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी सर्व महिला शिक्षक व विद्यार्थिनींनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग देऊन कार्यक्रम सफल बनविला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सौ. साधना पांडे यांनी केले.


0 Comments